23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रगणवेशानंतर वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

गणवेशानंतर वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. त्यातच, गेल्याच आठवड्यात दीपक केसरकर यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यावरुन, केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती, असे म्हटले होते. आता, केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे.

पुस्तकाला वह्याचीपाने जोडणा-या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार सुरू झाला आहे. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र, ज्याप्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिका-यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे.

पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्याप्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची, तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे.नवे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे, दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करुन ते रद्द होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शालेय शिक्षणमंत्री थेट वर्गातील बेंचवर
दरम्यान, शिक्षण खात्याचा पदभार मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचले आहेत. वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचनही करून घेतले. शिक्षकांच्या शाळेतील दप्तरांचीही तपासणी केली, मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्याचे पाहायला मिळाले शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार आदी अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा अशा सूचना शिक्षकांना मंत्रीमहोदयांकडून करण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR