पीलीभीत : उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशपोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. पाकिस्तान पुरस्कृत केझेडएफ म्हणजे खलिस्तान झिंदाबाद फोर्स या संघटनेचा डाव उधळून लावला. पीलीभीतमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन अतिरेकी ठार झाले. याबद्दल पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेलगत असलेल्या कलानौर पोलिस ठाण्यावर १९ डिसेंबर रोजी ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात या तिन्ही अतिरेक्यांचा समावेश होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचा पंजाब पोलिस घटनेपासून शोध घेत होते. या कारवाईबद्दल पीलीभीतचे पोलीस अधीक्षक अविनाश पांडेय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एका मोटारसायकलवरून तीन लोक फिरत आहेत. त्यांच्याकडे काही संशयास्पद वस्तू आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तिघेही मोटारसायकलवरून पीलीभीतकडे गेले आहेत.
ही माहिती मिळताच पंजाब पोलिस आणि पुरनपूर पोलिसांनी त्यांच्या पाठलाग केला. पुरनपूर आणि पीलीभीतच्या दरम्यान काम सुरू असलेल्या पुलावर पोलिसांनी तिघांना वेढा दिला. त्यानंतर हे लोक कालव्याच्या दिशेने वळले. पोलिसांनी त्यांना थांबायला सांगितले. तेव्हा त्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात तिन्ही तिन्ही अतिरेकी जखमी झाले. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, त्यांच्यावर पुरनपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिन्ही अतिरेक्यांचे परदेशात संबंध असल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले, अशी माहिती पांडेय यांनी दिली.
अतिरेकी कोण आहेत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही अतिरेक्यांची ओळख पटली आहे. जसन प्रीत सिंह उर्फ प्रताप सिंह (वय १८ वर्ष, रा. निक्का सूर, पोलिस ठाणे कलानौर, जि. गुरुदासपूर, पंजाब), विरेंद्र सिंह उर्फ रवि पुत्र रंजित उर्फ जीता (वय २३, रा. अगवाना, ठाणे कलानौर, जि. गुरुदासपूर, पंजाब), गुरविंदर सिंह (वय २५, रा. कलानौर, जि. गुरुदासपूर, पंजाब) अशी ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे आहेत.
लपण्यासाठी शोधत होते जागा
चकमकीनंतर पोलिसांनी दोन एके ४७ रायफल्स दोन पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेकी गुरुदासपूरवरून पीलीभीतला आले होते. बहुसंख्याक शीख वस्ती असलेल्या भागात ते लपण्यासाठी जागा शोधत होते. त्याच दरम्यान रविवारी (२२ डिसेंबर) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.