18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeराष्ट्रीयआठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचा समारोप

आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचा समारोप

बंगळुरू : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बंगळुरू येथे समारोप झाला. अडीच हजारापेक्षा अधिक व्यावसायिकांनी फेअरला भेट दिली. येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर फेअर सुरू होता. फेअरच्या समारोपासाठी आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते. प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या १०४ गारमेंट स्टॉल धारकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष
सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी, अमित जैन, प्रकाश पवार, सतीश पवार, अजय रंगरेज, रोहन बंकापुरे, विनायक माळगे, शैलेंद्र गणाते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले. यावेळी सहभाग घेतलेल्या स्टॉलधारकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पुढचं प्रदर्शन चेन्नईत भरविण्याची सूचना यावेळी काही स्टॉलधारकांनी केली.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले, की सरकारी पातळीवर गणवेश संदर्भात दरवर्षी निविदा निघतात. शालेय गणवेशाच्या निविदा देताना महिला सहकारी संस्थांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सोलापुरातील उद्योजकांनी एकत्र येऊन महिला सहकारी संस्था उभारणी करावी. यातून सर्वांना समान काम मिळेल. या उद्योगात महिलांची संख्या वाढेल.

सोलापुरातील उद्योजक ‘मेक इन इंडिया’च्या धरतीवर स्थानिक सोलापुरी गारमेंट उत्पादनात देशभर नाव करत आहेत. येथील उद्योजकांनी मार्केटिंग क्षेत्रात प्रगती करावी. सामूहिक मार्केटिंग यंत्रणा उभी करावी. यातून उद्योगाची प्रगती होईल. उद्योगात उलाढाल वाढेल. या फेअरमध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक गारमेंट उद्योजकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, इंग्लंड श्रीलंकेसह देश-विदेशातील मोठ्या गारमेंट निर्यातधारकांनी सोलापूरच्या गारमेंट उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली. गुजरात, आसाम, बंगळुरू, बिहार, तमिळनाडू, केरळसह भारतातील पंधराहून अधिक राज्यातील उद्योजकांनी गारमेंट फेअरमध्ये सहभाग घेतला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR