बुलडाणा : प्रतिनिधी
लोणार ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डला आग लागून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिभाऊ रोकडे (रा. पैठण) असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. रात्रीच्या दरम्यान कर्मचा-यांना जनरल वॉर्डमधून धूर निघत असल्याचे दिसून आल्यावर कर्मचा-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वॉर्डमधील रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२२ डिसेंबरला दुपारी मृत व्यक्ती हरिभाऊ रोकडे लोणार बसस्थानकावर अत्यावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने लोणार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बुलडाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, सदर व्यक्तीचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांना एकटे पाठवणे जमत नसल्याची माहिती डॉ. फिरोज शहा यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हरिभाऊ रोकडे यांना लोणार ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आले.
आगीत होरपळून मृत्यू
रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला २३ डिसेंबरच्या पहाटे हरिभाऊ रोकडे यांना ठेवण्यात आलेल्या वॉर्डातून धूर निघत असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकाने इतर कर्मचा-यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, हरिभाऊ रोकडे यांच्या बेडला आग लागून ते जळत असल्याचे त्यांना दिसून आले. या आगीत होरपळल्यामुळे रोकडे यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, तहसीलदार भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अन्त्यविधी करण्यात आला. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार भूषण पाटील, पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले हे उपस्थित होते.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
हरिभाऊ रोकडे रुग्णालयात विडी ओढत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचा-यांनी त्यांना विडी ओढू नका, असे सांगितले होते,अशी माहिती डॉ. फिरोज शहा यांनी दिली. त्यामुळे सदर आगीची घटना रुग्णाने विडी ओढल्या कारणाने घडली की शॉर्टसर्किटने घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, नितीन खरडे करीत आहेत.