27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रशहरांप्रमाणे ग्रामीण भागातही धावणार इलेक्ट्रिक बस

शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही धावणार इलेक्ट्रिक बस

ठाणे : प्रतिनिधी
शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार असल्याचे संकेत नवीन सरकारने दिले आहेत. एसटी महामंडळ यासाठी पुढाकार घेणार असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एसटी महामंडळ ग्रामीण भागामध्येही मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली. परिवहन मंत्री झाल्यानंतर मीरा भाईंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोस्टल मार्ग हा वाढवण बंदरापर्यंत विस्तारित होणार असल्याचेदेखील सांगितले. मीरा भाईंदरमध्ये डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाद्वारे या भागातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तसेच, सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशीदेखील मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

पाणीपुरवठ्यात वाढ, सीसीटीव्ही कॅमे-यांच्या संख्येत वाढ, दहिसर टोल नाक्याजवळील कोंडी दूर व्हावी, अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी तसेच भाईंदरमधून सुटणा-या एसटी बसची संख्या वाढवावी, असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागामध्येसुद्धा इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार आहेत. यामुळे इंधन खर्चात तसेच देखभाल-दुरुस्तीमध्ये बचत होणार असून प्रदूषण टळणार आहे. तसेच, प्रत्येक एसटी डेपोत अद्ययावत आणि स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे.

रात्रपाळी करणा-या एसटी चालक, वाहक इत्यादींसाठी झोपण्याची आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही कामे आपण प्राधान्याने हाती घेतली आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘‘टोल नाका हटवून फक्त अवजड वाहनांसाठी दोन टोल मार्गिका ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी शहराच्या विकासकामांसाठी अंदाजे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून मेट्रो तसेच रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली जाणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा हातभार लागेल,अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR