27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे गप्प का?

पंकजा मुंडे गप्प का?

अंजली दमानियांचा संताप अनावर

नाशिक : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून आता बीडमधील जनता रस्त्यावर उतरत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र २८ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर, या आंदोलनात राज्यातील अनेक भागातून नागरिक सहभागी होणार आहेत. काही वारकरी मंडळीही या आंदोलनात सहभागी होत बीडमधील दहशतीविरुद्ध आवाज उठवत आहेत. तसेच, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी देखील करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही बीडमध्ये जाऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत.

दमानिया यांनी पुन्हा एकदा वाल्मीक कराडला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, या हत्याप्रकरणावर पंकजा मुंडे गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख यांची लहान मुलगी रडताना दिसते, बोलताना दिसते तेव्हा आपण नागरिक म्हणून काय करतो याची मला खंत वाटते. चांगल्या लोकांनी जर घरात बसून राहिले तर अशी दहशत निर्माण करणा-या लोकांविरुद्ध कुणीच काही बोलणार नाही.

त्यामुळे, मी ठरवले की, २८ डिसेंबरला मी बीडमध्ये जाणार आहे, तिथं जी पदयात्रा आहे, त्यामध्ये वारकरी मंडळीही येणार आहे. मी पदयात्रेत जाऊन यांचे जे जे काळे कारनामे आहेत, त्यांविरुद्ध आवाज उठवणार आहे. जोपर्यंत वाल्मीक कराडला अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करून लढा उभा करणे हे मी माझे कर्तव्य समजते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही गप्प का? तुम्ही बीडच्या मंत्री आहात. ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवान गडावरून बोलला होतात, त्या व्यक्तीचा खंडणीच्या गुन्ह्यात सरळ सरळ सहभाग आहे. याशिवाय संतोष देशमुख खूनप्रकरणातही त्याचा हात आहे की नाही, यावर तुम्ही चकार शब्दही बोलत नाहीत. बीडच्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही यावर भूमिका घ्यायला हवी, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्यांचे फोटोही समोर आले, ते फोटो पाहून थरकाप उडाला. त्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात हे घाणीचे राजकारण, दहशतीचे राजकारण होत आहे ते थांबायला हवे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे सख्य कसे आहे हे समोर आले आहे. वाल्मीक कराड यांचे फडणवीसांपासून ते रोहित पवारांसोबत फोटो आले आहेत. या वाल्मीक कराडची बीडमध्ये दहशत आहे हे सगळेच सांगतात. मग, ही कसली दगडाची लोकशाही का? असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR