जाफराबाद : प्रतिनिधी
चिखली आगाराची जाफराबाद ते चिखली बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोळेगावजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून अपघात झाला.दरम्यान, कोळेगाव येथील नागरिकांना अपघात झाल्याची माहिती मिळताच तातडीने बसमध्ये असलेल्या वयोवृद्धांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी पुढाकार घेतला. अपघातात बसचे चालक संजय सोळुंखे हे किरकोळ जखमी झाले असून महिला वाहक सुषमा गवई यांना मुका मार लागला आहे.
जखमी प्रवाशांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश प्रवासी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाच्या वतीने तातडीने प्राथमिक उपचारासाठी हजार ते दीड हजारापर्यंतची मदत सात प्रवाशांना दिली. प्राथमिक तपासानुसार, बसने उसळी घेतल्याने चालकाचा ताबा सुटून बस खड्ड्यात पडली असावी असे जोगदंड यांनी स्पष्ट केले. या अपघातात बस पलटी झाल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
सदर अपघात जाफराबाद तालुक्याच्या हद्दीत झाला असल्याने जाफराबाद आगारातील तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.