नवी दिल्ली : एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता राखणा-या काँग्रेसला राज्यातील मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. दरम्यान, हे अपयश धुवून काढून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणा-या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून मंगळवारी पक्षाने आज झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिलीतील ३५ जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा केली.
त्यापैकी २८ जागांवरील उमेदवारांची नावं बैठकीत निश्चित करण्यात आली. तर ७ जागांवरील उमेदवारांबाबतचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघात अलका लांबा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेसने सीमापुरी येथून राजेश लिलोठिया, जंगपुरा येथून फरहाद सूरी, मटिया महल येथून आसिम अहमद आणि बिजवासन येथून देवेंद्र सहरावत यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली आहे. आसिम अहमद खान आणि देवेंद्र सहरावत हे आम आदमी पक्षाचे माजी आमदार राहिलेले आहेत. दोन्ही नेत्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यात काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये काँग्रेसकडून कुठलीही कसर बाकी ठेवण्यात आलेली नाही. पक्ष बुथ पातळीवर काम करण्यावर भर देत आहे. सोमवारी २३ डिसेंबर रोजी पुढील विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, जाहीरनाम्यामधून केवळ तीच आश्वासने दिली गेली पाहिजे जी पूर्ण करता येईल. काँग्रेस केवळ बाता मारण्यावर विश्वास ठेवत नाही.