अंकारा : तुर्कीतील शस्त्रास्त्र कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १२ जण ठार झाले आहेत. वायव्य तुर्कस्तानमध्ये असलेल्या कारखान्यात ही दुर्घटना झाल्याचे वृत्त दिले आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तुर्कीतील बालिकेसिर प्रांतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी युद्धसामग्री आणि स्फोटके बनवणारी झेडएसआर अॅम्युनिशन प्रोडक्शन फॅक्टरी आहे. येथे आज सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्फोटानंतर कारखान्याची इमारत कोसळली, तपास यंत्रणांकडून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तुर्की हा प्रमुख शस्त्र निर्यातदार देशांपैकी एक आहे. विशेषत: हा देश ड्रोन निर्मितीसाठी ओळखला जातो. २०२० मध्ये, उत्तर-पश्चिम तुर्कीमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सात लोक ठार आणि १२७ जखमी झाले होते. २०२३ मध्ये लष्करी स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला होता.