लातूर : प्रतिनिधी
प्रा. डॉ. सचिन चंद्रशेखर कंदले व कु. वैभवी घन:श्याम ढिवरे यांची वर्ष २०२४-२५ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून आज निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी केलेल्या घोषणेनुसार वरील जबाबदारींचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी दि. ०२ जानेवारी २०२५ ला लातूर येथे होणा-या ५९ व्या देवगिरी प्रदेश अधिवेशनात आपली जबाबदारी स्वीकारतील.
प्रा. डॉ. सचिन चंद्रशेखर कंदले यांचे शिक्षण संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी तसेच विद्यावाचस्पती पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ अणदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील कार्यकर्ते आहेत. २००३ पासून स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड येथे संस्कृत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. १९९२ पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात आहेत. त्यांनी २००० ते २००३ या वर्षात सातारा व मुंबई येथे विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले आहे.
१९९३ साली झालेल्या विराट विद्यार्थी मोर्चात सक्रिय सहभाग, दि. ३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपात सहाय्यता कार्यात सक्रिय सहभाग, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी नामांतर समर्थन आंदोलनामध्ये सक्रिय सहभागाव्दारे मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळ संवेदनशील आणि सक्षम बनविण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. शिक्षण क्षेत्रामधील नावीन्यपूर्ण प्रयोग व उपक्रमांमध्ये त्यांना विशेष रुची आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तत्कालीन शिक्षण अधिकारी व शैक्षणिक दुरवस्था याच्या विरोधात आंदोलने, छत्रपती संभाजीनगर, सातारा, मुंबई येथील विविध आंदोलनांतून सक्रिय सहभागाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले, सप्टेंबर २००२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या विराट विद्यार्थी मोर्चाची महाराष्ट्र प्रांत समन्वयक म्हणून जबाबदारी, कोरोना काळात गरजूंना औषध व शिधावाटपाचे काम केले. यापूर्वी शहर मंत्री, जिल्हा संयोजक, बीड शहराध्यक्ष, बीड जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा जबाबदा-यांचे निर्वहन त्यांनी केले आहे. वर्ष २०२४-२५ साठी त्यांची देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांचा निवास बीड येथे आहे. कु. वैभवी घन:श्याम ढिवरे मूळ धुळे येथील कार्यकर्त्या आहेत. २०२१ पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहेत. २०२४ पासून पूर्णवेळ आहेत. सध्या देवगिरी महाविद्यालयात विज्ञान शाखेत वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत.
महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेले युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर अधिकाधिक महाविद्यालयांत होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०२२ साली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर भरमसाठ शुल्कवाढीच्या विरोधात काढण्यात आलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे यशस्वी नेतृत्व, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षेच्या चुकीच्या निकालाविरोधात आंदोलन, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालणा-या सरकारविरोधात आंदोलने केली. तसेच २०२२ साली आंतरराज्य छात्र जीवनदर्शन आयोजित ‘राष्ट्रीय एकात्मता यात्रेत’ देवगिरी प्रांताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. याअगोदर धुळे शहर मंत्री, जिल्हा संयोजक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदा-यांचे निर्वहन केले आहे. वर्ष २०२४-२५ साठी त्यांची देवगिरी प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगर आहे.