25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रविजेच्या धक्क्याने ३ म्हशींचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने ३ म्हशींचा मृत्यू

व्हनाळी : व्हनाळी (ता. कागल) येथे महावितरणची विद्युतभारित तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यामुळे बहादुर गोपाळा वाडकर यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.
व्हनाळी गावच्या पश्चिमेला जाधव गु-हाळ घराजवळील चिमट्याचा ओढा येथे बुधवारी सकाळी ७ वाजता बहादुर वाडकर हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून त्यांना ओढ्यावर पाणी पाजून धुण्यासाठी गेले होते. म्हशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला.

यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसल्याने ते बचावले. त्यांनी काठावरून आरडाओरडा करत आजूबाजूला पाहिले असता ओढ्यावरील महावितरणची शेतीपंप (एल. टी. लाईन) ४४० व्होल्टची पोलवरील तार तुटून पाण्यात पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डोळ्यादेखत दुभत्या गाभण म्हशींचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी वायरमनला कळवून वीजप्रवाह बंद केला. तोपर्यंत म्हशींचा मृत्यू झाला होता. गावक-यांनी ओढ्यावर एकच गर्दी केली. तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला.

यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन महावितरणकडून नुकसानग्रस्त शेतक-याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलदिप गायकवाड, बाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव आदी उपस्थित होते. सदर घटनेची कागल पोलिसांत नोंद झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR