25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर बायकोसह अटकेत

कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर बायकोसह अटकेत

मुंबई : प्रतिनिधी
कल्याण पूर्व येथील एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे. आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याच्या बायकोलाही अटक केली आहे. पोलिसांनी विशाल गवळीची कसून चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कल्याण पूर्व येथील १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे. पोलिसांनी काल रात्री एका रिक्षाचालकाला अटक केली होती. तर आज बुलडाण्याच्या शेगावमधून आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली. पोलिसांनी या तिघांचीही कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी आहे का? याचा तपास करत असून घटनाक्रमही जाणून घेत आहेत.

विशाल गवळीने एक-दोन नव्हे तब्बल तीन लग्न केले होते. त्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत. विशाल गवळी हा अत्यंत मुजोर आरोपी असल्याचे आढळून आले आहे. अटक केल्यानंतरही त्याची मुजोरी गेली नाही. त्याने व्हिक्ट्रीचे चिन्ह दाखवले होते. त्याच्या या विकृतीमुळे सर्वच हादरून गेले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गवळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशालवर मालमत्तेशी संबंधित अनेक गुन्हे असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे आदी गुन्हे असल्याचेही सांगितले जात आहे. तो विकृत इसम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याची कुंडली काढली असता त्याने तीन लग्न केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे. त्याचाही पोलिस शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही शोधशोध सुरू केली आहे. आरोपींकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

कुणालाही सोडणार नाही
विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीसह इतर आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाणार असून या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेतला जाईल, असे कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

सीसीटीव्हीत काय दिसले?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
विशाल हा गेल्या वर्षापासूनच या मुलीला त्रास देत होता. त्याने गेल्यावर्षीच या मुलीला कोळसेवाडी परिसरात गाठून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या मुलीने त्याला प्रतिकार करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यावेळी या मुलीची सुटका करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR