बेळगाव : १९२४ साली बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा बेळगाव येथे २६ व २७ डिसेंबर रोजी होत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण करण्याबरोबरच रस्त्याशेजारील भिंतींवर आकर्षक रंगकाम केले आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा एकाच वेळी होत असल्यामुळे बेळगाव या सीमावर्तीय जिल्ह्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या दोन कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला सजविले असून, सुवर्ण विधानसौधची इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघाली आहे. काँग्रेसचे शतकमहोत्सवी अधिवेशन २६ व २७ डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सूरजेवाला आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत.
२७ डिसेंबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते सुवर्ण सौधसमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. २६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या १९२४ च्या अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या बेळगाव येथील वीर सौधच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. २६ डिसेंबर रोजी वीर सौधमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तर २७ डिसेंबर रोजी सीपीएड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
१०० वर्षे पूर्ण
२६ डिसेंबर १९२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनाला २६ डिसेंबर १९२४ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी भारत’ या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.