25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयनड्डांच्या घरी नेत्यांची रेलचेल

नड्डांच्या घरी नेत्यांची रेलचेल

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशपातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जातात की काय अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत. या बैठतीमध्ये एनडीएतील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्याच्या दृष्टीने विचार विनिमय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, जेडीयूचे नेते ललन सिंह, जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी, निषाद पार्टीचे संजय निषाद, हम पार्टीचे जीतनराम मांझी, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएचे इतर नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएमधील मित्र पक्ष असलेल्या भारत धर्मजनसेना पक्षाचे नेते तुषार वेल्लापल्ली हेसुद्धा जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बैठकीमध्ये सुरुवातीला हरयाणा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले जाईल. त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन आणि डॉ. आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा तसेच इतर मुद्यांवर चर्चा करून एनडीएमधील नेते
एका सूरामध्ये आपले म्हणणे मांडतील.

एनडीएच्या आधीच्या बैठकीमध्ये एनडीएचे सर्व नेते महिन्यातून एकदा बैठक घेतील, असे निश्चित झाले होते. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR