कीव्ह : गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. २३ डिसेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियाच्या कुर्स्क भागात रशियन सैन्याच्या वतीने लढणारे ३००० हून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत. एका अहवालानुसार, ऑगस्टच्या सुरुवातीपासून रशियाने सुमारे १२,००० उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेनमध्ये पाठवले आहेत.
झेलेन्स्की यांनी रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या लष्करी सहकार्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे आधुनिक युद्ध तंत्रज्ञान आणि लष्करी अनुभवाची देवाणघेवाण होऊ शकते, असे ते म्हणाले. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील या सहकार्यामुळे अतिरिक्त सैन्य आणि लष्करी साहित्याचा पुरवठा होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. परिणामी युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल.
मारल्या गेलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या संख्येच्या माहितीचा संदर्भ देताना, झेलेन्स्की म्हणाले की, त्यांचे मूल्यांकन युक्रेनियन गुप्तचरांनी गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. दक्षिण कोरियाचे खासदार ली सुंग-कॉन यांनी १९ डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करून उत्तर कोरियाचे १०० हून अधिक सैनिक मारले गेले आहेत आणि सुमारे १,००० जखमी झाले आहेत.
दरम्यान, रशियन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने मंगळवारी युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य केले, त्यात किमान एकाचा मृत्यू झाला. स्थानिक अधिका-यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात आणखी ११ जण जखमी झाले असून चार मजली इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी लोक अडकले असल्याची शक्यता गव्हर्नर सेर्ही लायसाक यांनी दिली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडीओंंमध्ये इमारतीची एक बाजू जवळजवळ पूर्णपणे कोसळल्याचे दिसून आले आहे. २५ डिसेंबर रोजी युक्रेन अधिकृतपणे दुस-यांदा ख्रिसमस साजरा करण्याची तयारी करत असताना हा हल्ला झाला.