इंफाळ : मागील काही महिन्यांपासून सतत हिंसाचार होत असलेल्या मणिपूरला अखेर नवीन राज्यपाल मिळाले आहे. हिंसाचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. पण मुख्यमंत्री न बदलता राज्याला नवे राज्यपाल देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवृत्त केंद्रीय गृह सचिवांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे
निवृत्त केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला हे मणिपूरचे राज्यपाल असतील. ते १९८४ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. भल्ला हे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडून पदभार स्वीकारतील. आचार्य यांच्याकडे मणिपूरची अतिरिक्त जबाबदारी होती. भल्ला हे ऑगस्ट महिन्यातच सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. माजी लष्करप्रमुख विजय कुमार सिंह यांच्या खांद्यावरही राज्यपालपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते मिझोरामचे राज्यपाल असतील. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचे ते २०१४ ते २०२४ या कालावधीत प्रतिनिधित्व करत होते. पण त्यांनी २०२४ ची निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यपालपदी बढती दिली आहे.
केरळ आणि बिहारच्या राज्यपालांमध्ये अदलाबदली करण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान हे बिहारचे नवे राज्यपाल असतील. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर हे खान यांची जागा घेतील. खान यांची २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मिझोरामचे राज्यपाल हरि भाऊ कंभाम्पती हे आता ओडिशाचे राज्यपाल असतील.
ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. ते पुन्हा सक्रीय राजकारणात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ते भाजपचे झारखंडमधील नेते असून विधानसभा निवडणुकीआधीच ते पुन्हा राजकारणात परतण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा होती. पण त्यांच्या सुनेला तिकीट देण्यात आल्यास दास यांनी माघार घेतली होती.