शिमला : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनाली येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत हिमाचलमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. यामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचलमधील तीन राष्ट्रीय महामार्गांसह किमान २२३ रस्ते बंद झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिमला, कुल्लू, मंडी, चंबा आणि सिरमौर जिल्ह्यांसह किन्नौर, लाहौल आणि स्पीती भागात जोरदार हिमवृष्टी झाली आहे. येथे प्रतिकूल हवामान असतानाही पर्यटकांचा ओघ कमी झालेला नाही. शिमल्यातील हॉटेल्स हाउसफुल्ल झाली आहेत. येथील खोल्यांचे बुकिंग ७० टक्के झाले आहे. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के अधिक आहे असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.
स्थानिक रिपोर्टनुसार, अटारी ते लेह, कुल्लू जिल्ह्यातील सांज ते औत आणि किन्नौर जिल्ह्यातील खाब संगम आणि लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील ग्रामफू येथील राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने गेल्या सोमवारी अटल बोगद्यात अडकलेल्या सुमारे ५०० वाहनांमधील पर्यटकांची सुटका केली होती. दरम्यान, अनेक वाहने रस्त्यावरून घसरून अपघात झाले आहेत. यामुळे गेल्या २४ तासांत किमान चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
शिमल्यातील १४५ रस्ते बंद
शिमल्यातील १४५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच कुल्लूमधील २५ आणि मंडी जिल्ह्यातील २० रस्ते बंद करण्यात आले. अनेक भागातील वीज सेवा खंडित झाली आहे.