इंफाळ : मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील लीसांग गावात स्फोटाचा मोठा कट उधळला असून आसाम रायफल्स आणि पोलिसांनी इंफाळ-चुराचंदपूर रस्त्यावरील एका पुलाखाली ३.६ किलो स्फोटके, डिटोनेटर्स, कॉर्डटेक्स आणि इतर वस्तू जप्त केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये दहशत निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. भारतीय लष्कराच्या सक्रियतेमुळे कट उधळून लावला आहे. मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील लेसियांग गावात आयईडी असल्याची माहिती लष्कराला मिळाली. यावर आसाम रायफल्स युनिट आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. इंफाळ-चुराचंदपूर रस्त्यावरील एका पुलाखाली ३.६ किलो स्फोटके, डिटोनेटर आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
तत्पूर्वी, मणिपूरमधील सुरक्षा दलांनी सोमवारी चुराचंदपूर जिल्ह्यातील तेजांग गावात शोध मोहीम राबवली. येथून तीन देशी बनावटीचे रॉकेट, मॅगझीनसह एक ३०३ रायफल, चार पिस्तुले, सहा देशी बनावटीचे बॉम्ब आणि ४५ कांड्या कमी दर्जाची स्फोटके व इतर काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. लेसियांग गावात सुरक्षा दलांनी नऊ आयईडी आणि डिटोनेटर जप्त केले. याशिवाय, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मारिंग सँडांगसेंगबा येथे नगारियान टेकडीवर मॅगझिनसह एक ७.६२ मिमी एलएमजी, एक सिंगल बॅरल बंदूक, एक ९ मिमी पिस्तूल आणि दोन ग्रेनेड आणि इतर काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. १७ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मॅपिथेल रिज परिसरातून २१.५ किलो वजनाचे पाच आयईडी जप्त केले होते.