पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू पक्षाचे प्रमुख नितीश कुमार आणि ओरिसाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. ही मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बेगुसराय मतदारसंघाचे खासदार गिरिराज सिंह यांनी केली आहे.
भाजप खासदार गिरिराज सिंह म्हणाले की, २०२५ मध्ये होणा-या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. कोणीही संभ्रमात राहू नये. लालू प्रसाद यादव सर्वतोपरी प्रयत्न करतील, पण बिहार विधानसभेच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी पक्ष जनता दल(युनायटेड)ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. जेडीयूचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि पक्षाचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तसाच राहील. दरम्यान, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीदेखील म्हटले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी बिहार विधानसभा निवडणूक लढवेल. २०२५ च्या अखेरीस बिहारमध्ये २४३ विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे.