वॉशिंग्टन : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने तेथील अंतरिम सरकारला थेट इशारा दिला आहे. यासंदर्भात, संयुक्त राष्ट्रांनी बांगलादेशला देशातील सर्व नागरिकांच्या मानवाधिकाराचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणातही या मुद्यावर चर्चा झाली.
सुलिव्हन यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात, बांगलादेशातील मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात व्हाइट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी धर्माची पर्वा न करता सर्व लोकांच्या मानवाधिकारांचा आदर आणि संरक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
हिंदू मंदिरांवर होतायेत हल्ले
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू समाजावर आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. विशेषत: शेख हसीना सरकार गेल्यानंतर, या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. व्हाईट हाऊसने १३ डिसेंबर रोजी म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, अमेरिका धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी देशाच्या अंतरिम सरकारला जबाबदार धरेल.