पाथरी : सास-याने आपल्या सुनेवर कोयत्याने हातापायासह शरीरावर विविध ठिकाणी सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील महिपाल गल्लीत घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनेला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले तर सास-यास त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांनी बेदम चोप दिला. दरम्यान या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी येथील महिपाल गल्ली येथे सासरा शेख अमीन कालू हे आपल्या दोन मुलांसह राहतात. सोमवार, दि.२३ रोजी दोन्ही मुले घराबाहेर गेल्याने घरात असलेली सून रेष्मा शेख शकील (वय ३०) हिच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरूवात केली. सदरील महिलेने बचावासाठी मोठे प्रयत्न केले मात्र सास-याने तिच्या हातापायासह शरीराच्या विविध भागावर गंभीर वार केले. यात ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी तात्काळ महिलेला रूग्णालयात दाखल केले.
सासरा शेख अमिन कालू यास उपस्थितांनी बेदम चोप दिला. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला परभणीतील खाजगी रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी या महिलेवर शस्त्रक्रीया करत तिचे पाय व हात काढून टाकण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे संबंधीत डॉक्टरांनी सांगितले तर सास-यास झालेल्या मारहाणीत तेही जखमी झाल्याने त्यांना परभणी येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार कशामुळे घडला हे मात्र समजू शकले नाही. मात्र पाथरी पोलिस ठाण्यात या घटनेतील आरोपी सासरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार करत आहेत.