31.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeसोलापूरकरमाळ्यात दूषित पाणीपुरवठा, शहरवासीय संतप्त

करमाळ्यात दूषित पाणीपुरवठा, शहरवासीय संतप्त

करमाळा : उजनी धरण तुडुंब भरलेले असतानाही शहराला होणारा पाणीपुरवठा अनेकवेळा अनियमित व दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही होत नाही’धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती शहराची झाली आहे.

केवळ नियोजनाअभावी करमाळकरांना दोन दिवसांआड नव्हे तर मनमानी पद्धतीने पाणीपुरवठा होत आहे. अपुऱ्या दाबाने होणारा हा पाणीपुरवठा खूपच कमी वेळ होत असल्याने सहनशील, सोशिक करमाळकर मिळेल तेवढ्या पाण्यात समाधान मानून संयम बाळगून आहेत. पाईपलाईनमध्ये असलेल्या बिघाडामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे.

पाणीपुरवठा ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अनेक भागात गाळयुक्त, अपुऱ्या दाबाने, फेसाळ आणि काळे पाणी येत आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. नगरपालिकेने लवकरात लवकर पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुतार गल्ली आणि दत्तपेठ तसेच शहरातील नागरिकांनी दिला आहे.

दोन दिवसांआड पाणी येत असल्यामुळे नागरिक इतर कामे सोडून नळाला पाणी येण्याची वाट पाहत बसतात. पाणी सुटण्याची वेळ सकाळी साडेसातची असली तरी किमान पाच मिनिटे नगरपालिकेच्या नळ संयोजनातून केवळ हवा येत असते. त्यानंतर दहा मिनिटांपर्यंत बुडबुडे येतात. केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते तेही गाळयुक्त, फेसाळ आणि काळ्या रंगाचे. अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा असल्याने मोटारी लावल्याशिवाय पाणी भरणे अशक्य असते. स्वच्छ पाणी यायला सुरुवात झाल्यानंतर मोटार लावेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होतो.

केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसेही पाणी मिळत नाही आणि त्यांना पुन्हा दोन दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागते. ठिकठिकाणी बांधकामे चालू आहेत. त्यामुळे खडी, वाळू साचल्याने गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे कुठून तरी अशुद्ध पाणी पाईपलाईनमध्ये जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून हे लिकेज शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.असे पाणीपुरवठा विभाग कर्मचारी कमलेश भोज यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR