मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा आराखडा सर्व विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणा-या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणा-या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, वन व कृषि विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, कृषि विभागाच्या सचिव जयश्री भोज, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, वित्त विभागाच्या सचिव शैला ए आदी उपस्थित होते.
मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी. या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे. पुढील १०० दिवसांच्या आराखड्यात अशा उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. वृक्ष लागवडीचा संस्कार रूजण्यासाठी ती कायम स्वरूपी अंमलात आणावी. या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुस होण्यासाठी काम करण्यात यावे. यावेळी संबंधित विभागाच्या सचिवांनी विभागांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरांत मियावॉकी वृक्ष लागवड करा
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे नेण्याची व्यवस्था करावी, असे सांगतानाच शहरी भागात वनीकरण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी मियावॉकी वृक्ष लागवड पद्धत शहरांमध्ये उपयोगात आणावी, असे सांगितले.
शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना आखा
शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेती विकासाला चालना देणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणा-या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून शैक्षणिक संकुल निर्माण करावे, असेही ते म्हणाले.