23.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना फक्त दीड हजार!; बहिणींचा हिरमोड

लाडक्या बहिणींना फक्त दीड हजार!; बहिणींचा हिरमोड

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांवर बहिणींच्या आशा पल्लवित होत्या, परंतु २४ डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेतून मिळालेली सन्मान निधीची रक्कम फक्त १५०० रुपये खात्यात जमा झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर सभांमधून सन्मान निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. हे वचन महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरले होते आणि अनेक बहिणींनी या योजनेवर विश्वास ठेवला होता.

मात्र, सत्तेत आल्यानंतर आश्वासन पूर्ण होण्याऐवजी बहिणींना पुन्हा फक्त १५०० रुपयांवर समाधान मानावे लागले. २४ डिसेंबरला सन्मान निधीचे पैसे खात्यात जमा होताच बहिणींच्या चेह-यावर आनंदापेक्षा नाराजीचा सूर दिसून आला. यामुळे योजनेबाबत सरकारविषयी नाराजी आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या होत्या. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात प्रत्येक बहिणीला ३००० रुपये सन्मान निधी आणि २५०० रुपये बोनस असे एकूण ५५०० रुपये मिळतील, असे मेसेजेस सातत्याने फिरत होते. या घोषणांमुळे अनेक बहिणींच्या आशा उंचावल्या होत्या. दिवाळीच्या खर्चासाठी, मुलांच्या शाळेच्या फी भरायला किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा मोठा आधार होईल, असे त्यांना वाटले.

मात्र, त्यावेळीही सरकारने फक्त १५०० रुपये जमा करून आशा फोल ठरवल्या. आता पुन्हा २१०० रुपये जमा होण्याची अपेक्षा असताना फक्त १५०० रुपये मिळाल्याने बहिणी निराश झाल्या आहेत. आता तरी आश्वासन पूर्ण होईल या अपेक्षेने डोळे लावून बसलेल्या बहिणींचा सरकारच्या या निर्णयाने हिरमोड झाला आहे.

बहिणींना फसवून केवळ राजकीय स्वार्थ साधला जात आहे, अशी भावना अनेक भगिनींमध्ये दिसून येते. महायुती सरकारने दिलेले वचन आणि त्याची पूर्तता यात मोठी दरी असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठमोठ्या घोषणा करून मतं गोळा करणा-या सरकारकडून बहिणींना अधिक अपेक्षा होत्या. मात्र, सरकारने दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह?
लाडकी बहीण योजना हा केवळ एक राजकीय स्टंट होता का? या प्रश्नाचे उत्तर जनतेला येत्या काळात मिळेल. मात्र, सध्या तरी बहिणींच्या चेह-यावर नाराजी स्पष्ट दिसत आहे, आणि सरकारच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR