मुंबई : प्रतिनिधी
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाल्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ‘पृथ्वीतलावरचा देवदूत’ अशी उपमा संजय राऊत यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले ही देशाची हानी आहे. सध्याच्या सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेला इतके सुरुंग लावले तरी ती टिकून आहे. याचे सर्व श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला विरोधी पक्षातील एक नेता म्हणून आणि अर्थतज्ज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांनी दिलेले सर्व इशारे आतापर्यंत खरे ठरले आहेत. नोटाबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल, असे मनमोहन सिंग म्हणाले होते. ते खरे ठरले. असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले.
मुंबईवर त्यांचे विशेष प्रेम -पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, देशाच्या तिजोरीत १५ दिवस पुरेल इतकाच पैसा असताना नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केले. आज नरेंद्र मोदी फुकट धान्य देत आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही, प्रत्येकाच्या घरात चूल पेटती राहावी, ही योजना मनमोहन सिंग यांची आहे. अन्नसुरक्षा कायदादेखील त्यांनीच आणला. अशा अनेक योजना आहेत, ज्या त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक असा त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला. मुंबईवर त्यांचे विशेष प्रेम होते.
नरेंद्र मोदींची एकही पत्रकार परिषद नाही
मुंबईतील मेट्रोचे श्रेय मनमोहन सिंग यांना देईन. पहिले उद्घाटन त्यांनी केले होते. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. ते पंतप्रधान होते. त्यावेळीदेखील त्यांचा आमच्याशी आणि आमचा त्यांच्याशी कायम संवाद राहिला आहे. विरोधी पक्षात असतानाही आमचा संवाद राहिला. डॉ. मनमोहन सिंग आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी २५० हून अधिक पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, जितक्या कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असा टोलादेखील राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.