मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता सलमान खान २७ डिसेंबर रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज सलमानच्या वाढदिवसानिमित्त ‘सिकंदर’चे निर्माते ए. आर. मुरुगदास चित्रपटाचा टीझर रिलीज करणार होते. मात्र, २६ डिसेंबर रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टीझर लॉन्चची तारीख बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. दरम्यान ‘सिकंदर’च्या टीझर रिलीजची नवी तारीखही आता घोषित केली गेली आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात सलमान खानचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट, ‘सिकंदर’ चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर ‘सिकंदर’चा टीझर पोस्ट केल्याची माहिती दिली आहे. ‘सिकंदर’चा टीझर आज, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.०७ वाजता रिलीज होणार होता.
दरम्यान एक्सवर ‘सिकंदर’च्या निर्मात्यांनी माजी पंतप्रधानांच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिले की, आमच्या आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर, आम्हाला जाहीर करताना दु:ख होत आहे की, ‘सिकंदर’चा टीझर २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत रिलीज होईल, या दु:खाच्या प्रसंगी आमच्या संवेदना देशाबरोबर आहेत, टीम सिकंदर.