बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली येथील टिळकवाडीतील वीरसौध परिसरात १९२४ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण आणि दुर्मीळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते, तर छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी वीरसौध वास्तूतील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बैठ्या पुतळ्याला अभिवादन करून
आदरांजली वाहिली.
याप्रसंगी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ तथा राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.
१९२४ मध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या रामतीर्थनगर येथील स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले.
‘गांधी भारत – १००’ कार्यक्रमांतर्गत शंभर वर्षांपूर्वी पार पडलेल्या येथील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. १५ गुंठे जागेत बांधण्यात आलेल्या या स्मारकासाठी १ कोटी ५८ लाख रुपये इतका खर्च आला आहे. स्मारकात दिवंगत देशपांडे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. तसेच बेळगाव अधिवेशन, महात्मा गांधीजी यांच्या हुदली येथील आठवड्याच्या वास्तव्यात पार पडलेले ग्रामोद्योग प्रदर्शन आणि गांधीजींच्या जीवनातील अन्य दुर्मीळ छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली आहेत.