कराड फरार, २ अंगरक्षकांकडेही विचारपूस
केज : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. त्याही प्रकरणात ते अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, वाल्मिक कराडच्या २ अंगरक्षकांचीदेखील सीआयडीकडून चौकशी केली आहे.
वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा आहे. या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहे. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये सीआयडीचे पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते. त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष
चव्हाण यांची चौकशी
सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या पीआरचे काम वाल्मीक कराड बघायचे. माझा त्यांचा संपर्क होत होता. मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलावून घेतले होते, असे चव्हाण यांनी सांगितले.
विष्णू चाटेचीही चौकशी
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटे याचीही कसून चौकशी केली जात आहे. विष्णू चाटे याला चौकशीकामी सीआयडी पथकाने घटनास्थळी नेले. त्यावरून आता त्याच्यामागेही चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. दरम्यान, सीआयडीचे ३ अधिका-यांनी आज परळी पोलिस ठाण्यात जाऊन तपास सुरू केला आहे.