बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करतानाच त्यांना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नये, अशी मागणी एकमुखाने केली. बीडमधील दहशतीला मुंडे कारणीभूत असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे बंधू भगिनींवर जोरदार हल्लाबोल केला. बीडमधील या विराट मोर्चाला जिल्ह्यातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या मोर्चाला लोकांनी मोठी गर्दी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. हातावर, डोक्याला काळ््या पटट्या आणि हातात संतोष देशमुख यांचे बॅनर घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले. मूक मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे आणि दीपक केदार यांनी संबोधित केले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीनेसुद्धा मोर्चाला संबोधित केले. यावेळी वैभवीने काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडील कधीच दिसणार नाहीत म्हणताच मोर्चातील जनता गहिवरली.
या विराट मूक मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य नागरिकसुद्धा सहभागी झाले. आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत, आम्हाला न्याय द्यावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. बीडमधील या विराट मोर्चाला जिल्ह्यातील जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारवर वाल्मिक कराडवर कारवाईसाठी दबाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल १९ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमुख आरोपी अजूनही सापडत नसल्याने आणि खंडणीखोर वाल्मिक कराड फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपी सापडला नाही तर हातात दंडुके घेणार
संतोष देशमुख हत्येतील आरोपी सापडला नाही आणि तुम्ही जातीयवादी मंत्र्याला पोसणार असाल तर दंडूके हाती घ्यावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच राज्यात इतर जिल्ह्यांतही असेच मोर्चे निघतील, असेही ते म्हणाले. आमच्या मुलांनी कमेंट केली तर अटक केली, मग खुनाचे आरोपी तुम्हाला का सापडत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. मला माहित नाही त्यांचा राजीनामा घेतील की नाही. पण बीडच्या सगळ््या जनतेला मला सांगायचे आहे की, त्यांना जर (धनंजय मुंडे) पालकमंत्रीपद दिले तर छत्रपती घराणे बीडचे पालकत्व घेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
जिल्ह्यात जन्म झाला असेल तर राजीनामा द्या
तुम्हाला खरेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल आणि या बीड जिल्ह्याच्या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही सांगा की, राजीनामा फेकून मी पुढील चौकशीसाठी समोर जात आहे. असे आव्हान खा. बजरंग सोनवणे यांनी दिले.
…तर राज्यात आग भडकेल
बीडमध्ये अनेकांची हत्या झाली आहे. माझ्या बहिणीचे कुंकू पुसले गेले आहे. पुसले गेलेलं कुंकू कोणी परत आणू देणार आहे का, असा सवाल उपस्थित करीत आ. जितेंद्र आव्हाड यांनी हा वाल्मिक नाही, वाल्या आहे. याच्यावर वेळेत कारवाई झाली नाही तर राज्यात आग लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनीही वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली.
मुंडेंनी पालकमंत्रिपद भाड्याने दिले : धस
धनंजय मुंडे यांनी मागच्या वेळी केवळ पालकमंत्रीपद नाही तर कृषिमंत्रीपदही भाड्याने दिले. ऊसतोड मशिनसाठी ४ लाख दिले तरच फाईल मंजूर होत होती. ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी आहे, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. १४०० एकर जमीन यांनी ढापल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरोपीली शिक्षा झाली पाहिजे
कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधातदेखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असे अभिमन्यू पवार म्हणाले.