पाटणा : पकडवा शादी (तरुणाचे अपहरण करुन बळजबरीने लग्न लावणे) बिहारमधील मागील काही वर्षांमधील चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र अशाच प्रकारचे बळजबरी लग्नाला नुकताच बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक झालेल्या तरुणाला जावे लागले आहे. बंदुकीच्या धाकावर अपहरणकर्त्याच्या मुलीशी बळजबरीने लग्न लावण्यात आले, असे वृत्त आहे. या घटनेमुळे बिहारमधील पकडवा शादी हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम कुमारने नुकतीच बिहार लोकसेवा आयोगाची शिक्षक होण्यासाठीची परीक्षा पास केली होती. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात पाटेपूरच्या रेपुरा येथील उत्क्रमित मध्य विद्यालयात त्याची नियुक्ती झाली होती. बुधवार, २९ नाव्हेंबर तीन ते चार जण गौतम कुमार नोकरी करत असलेल्या शाळेत आले. त्यांनी त्याचे अपहरण केले. यानंतर २४ तासांच्या आत बंदुकीच्या जोरावर अपहरणकर्त्यांपैकी एकाच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले.
कुटुंबीयांचा रस्ता रोकोवरुन तीव्र निषेध
गौतम कुमारच्या कुटुंबीयांनी अपहरण आणि जबरदस्तीने लावण्यात आलेल्या लग्नाचा तीव्र निषेध केला. पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तसेच बेपत्ता शिक्षकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू करण्यापूर्वी श्री कुमारच्या कुटुंबीयांनी बुधवारी रात्री रस्ता अडवून निषेध केला. राजेश राय याने आपल्या गौतम कुमारला जबरदस्तीने नेऊन श्री. राय यांची मुलगी चांदनीशी लग्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरणकर्त्यांविरुद्ध पुढील कारवाई करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.