लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणारा दर्शवेळा अमावस्येचा सण सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच ग्रामीण भागात शेतकरी कुटुंब ‘येळवस’ घेऊन शेताकडे निघाल्याने गावागावातील शिवार रस्ते फुलल्याचे चित्र होते. शेतात कुटूंबासह मित्रमंडळींना सोबत घेऊन सर्वांनी भज्जी-आंबिलीचा आस्वाद घेतला.
लातूरसह धाराशीव व कर्नाटकच्या सीमा भागात दर्शवेळा अमवस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्त ग्रामीण भागात चार-पाच दिवसांपासून दर्शवेळा अमावस्येनिमित्त मोठी तयारी सुरु होती. तर सोमवारी सकाळपासूनच शेतकरी कुटूंब पूजेसही जेवणाचे साहित्य घेऊन शेताकडे जातानाचे चित्र पाहावयास मिळाले. शेतशिवारांनी कडब्याची कोप तयार करुन पांडवांची पुजा सहकुटूंब करतात. उंडे, रोडगा व सर्व भाज्या एकत्र तयार करुन केलेली भज्जी, तांदळाची तसेच गव्हाची खीर, भात, बाजरीची भाकर, अंबिल, कोंदीची पोळी, वांग्याचे भरीत, कडक भाकरी, धपाटे, अशा अनेक पदार्थांचे खास मेनू शेतशिवारांतील पंक्तीत दिसून आले.
येळवसचे खास मेनू म्हणजे भज्जी आणि आंबिल. एका मडक्यात ताकापासून स्वादिष्ट आंबिल डोक्यावर घेऊन कपाळावर नामपट्टा ओढून शेतकरी घरुन निघतात. मग त्याबरोबर खास केलेली भज्जी, भाकरी, खीर यासह पूजेचे साहित्य आदींसह सर्वजण शेतात जातात. त्यात बच्चे कंपनीचा उत्साह पाहावयास मिळतो. शेतात पुर्वी विहिरीचे पाणी पिण्यासाठी असायचे. पण अलिकडे मिनरल वॉटरचे जार, बाटल्या शेताकडे वाहनातून नेताना अनेकजण दिसत होते. तर पळसाच्या पानापासून पत्रावळ्या, द्रोण तयार केले जायचे. पण आता मात्र रेडिमेड पत्रावळी, द्रोण वापरण्यास अनेकांनी प्राधान्य दिले.