परभणी : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून वाहने चालवतात. या पार्श्वभुमीवर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील अवैध दारू साठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शहरातील तेली गल्ली येथील करण्यात आलेल्या कारवाईत दोन आरोपींकडून ७४ हजार ३२० रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
नानलपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड व त्यांच्या पथकाने शहरातील तेली गल्ली येथे अवैधरित्या दारूची विक्री करणा-या आरोपी सागर प्रकाश खिल्लारे (रा. राहूल नगर, परभणी) व चंदन शोभालाल शिरसे (रा. परभणी) यांच्या ताब्यातून एकुण ७४ हजार ३२० रूपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नानलपेठ चितांबर कामठेवाड, पोलिस अंमलदार निलेश कांबळे, शोएब पठाण, विठ्ठल हेडे यांच्या पथकाने केली. कोणीही मद्य प्राशन करून गाडी चालवू नये. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.