28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमनोरंजननाटक सुरू असताना शरद पोक्षें संवाद विसरले

नाटक सुरू असताना शरद पोक्षें संवाद विसरले

पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द

पुणे : ‘रसिक हो…मी पुरता ब्लँक झालोय, मला काहीच आठवत नाहीये, मला जरा वेळ द्याल का?’ अशी विनंती नाटक सुरू असताना रंगमंचावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली. त्याला रसिकांनी टाळ्या वाजवून संमती दिली. पण पोंक्षे यांना काहीच आठवत नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला. यावर रसिकांनी मात्र नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले. हा प्रकार बालगंधर्व रंगमंदिरात घडला. पोंक्षे यांना काहीच आठवत नसल्याने त्यांची तब्येत बरी नसल्याचे समोर आले. आतापर्यंतच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडल्याचे ते बोलले.

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेली ‘पुरुष’ ही कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. नाटक रंगात आले असताना एका प्रवेशानंतर अभिनेते शरद पोंक्षे अचानक सर्वकाही विसरले, ब्लँक झाले आणि थांबले. रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृह गच्च भरलेले असताना मंचावर असलेले पोंक्षे सर्वकाही विसरून गेले. ते म्हणाले, रसिकहो.. मी पुरता ब्लँक झालोय. मला काहीच आठवत नाहीये. मला जरा वेळ द्याल का? त्यावेळी सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना संमती दिली. पुढे प्रयोग रद्द झाल्याचे घोषित केले गेले. पण प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन पोंक्षे पुन्हा मंचावर आले. ४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असे झाल्यामुळे पोंक्षेंना गहिवरून आले होते. पण प्रेक्षकांनी त्यांना थांबवले आणि आतापर्यंतचा प्रयोग उत्तम झाल्याचे सांगत यापुढचे सगळे प्रयोग यशस्वी होतील अशा सदिच्छाही दिल्या.

सोमवारी दुपारी १२:३० वाजता पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पुरुषच्या प्रयोगाला गेलो होतो. पहिला अंक उत्तम झाला, पण दुस-या महत्त्वाच्या सीनची सुरुवात झाली आणि शरद पोंक्षे नुसते प्रेक्षकांकडे बघत होते. आधी वाटलं कोणीतरी मोबाइलचा आवाज किंवा फोटो काढतंय. पण नंतर ते म्हणाले रसिक प्रेक्षकहो.. मी पूर्ण ब्लँक झालोय, मला काहीही आठवत नाहीये, २ मिनिटे थांबू का? प्रेक्षक म्हणाले, आम्ही तुमचे फॅन आहोत, तुम्ही वेळ घ्या, मग सगळे लाइट्स बंद केले, ते आत विंगेत गेले, २ मिनिटांऐवजी ५ मिनिटे झाली, १०/१५ मिनिटे झाली. मग दिग्दर्शकांनी स्टेजवर येऊन सांगितले की, त्यांना थोडी विश्रांती घेतली की बरे वाटेल तेव्हा आम्ही आता मध्यंतर घेत आहे. त्यानंतर अर्धा-पाऊण तास झाला, स्टेजवरचे लाइट्स लागले, म्हणून सगळे प्रेक्षक खुर्चीवर जाऊन बसले, २ मिनिटांनी शरद पोंक्षेंना धरून स्टेजवर आणले! ते म्हणाले गेल्या ४० वर्षांत असे पहिल्यांदा होत आहे, मी तुमची माफी मागतो आणि तुमचे पैसे परत मिळतील…प्रेक्षक म्हणाले, आम्ही पुन्हा तुमचा प्रयोग पहायला येऊ!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR