19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमुख्य बातम्याअजित पवारांकडे बीडचे पालकमंत्रिपद ?

अजित पवारांकडे बीडचे पालकमंत्रिपद ?

बीड : प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रि­पदावरून हटवा, अशी मागणी जोर धरत आहे.

बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.

बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतून बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाले असल्याचे समजते. जिल्ह्यात घडणा-या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार स्वत:कडे घेऊ शकतात.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दोन आठवडे उलटल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी महायुतीत तीन पक्ष असल्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यायचे, याबाबत अजूनही खल सुरू आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR