16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसोलापूरमहापालिकेच्या बांधकाम, नगररचना विभागात खांदेपालट

महापालिकेच्या बांधकाम, नगररचना विभागात खांदेपालट

सोलापूर : महापालिकेतील बांधकाम आणि नगर रचना विभागात मोठी खांदेपालट झाली आहे. कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता आणि उपअभियंता यांच्या बदल्या केल्या आहेत. काही कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती दिली आहे. या खांदेपालटावरून कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशाने या बदल्या केल्या आहेत. १२ कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देऊन सहायक अभियंते केले आहे. खातेनिहाय पदोन्नती समितीने विविध विभागातील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) यांची सहाय्यक अभियंता या पदावर पदोन्नती केली आहे. या पदावर त्यांची वेतनश्रेणीही वाढली आहे. शासनमान्य भत्तेही वाढले आहेत. विभागीय कार्यालय क्रमांक एकचे कनिष्ठ अभियंता प्रकाश सावंत यांना सहायक अभियंता पदावर पदोन्नती देऊन त्याच विभागात बदली केली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक आठचे विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर यांना सहायक अभियंता पदावर पदोन्नती देऊन विभागीय अधिकारी पदावर कायम ठेवले आहे.

मोहम्मद हनीफ बक्षी यांना सहाय्यक अभियंता म्हणून विभागीय कार्यालय क्रमांक तीन येथे नेमणूक दिली आहे. गेल्या आठवड्यातच सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातून त्यांची विभागीय कार्यालयात बदली केली होती. नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंता शकील शेख, इर्शाद हुसेन जरतार यांना सहायक अभियंता पदावर पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती त्याच विभागात केली आहे. सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील नरेश शेटे, मनोज मसलखांब, आरिफ कंदलगावकर यांना कनिष्ठ अभियंता पदावरून सहायक अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक सहाचे कनिष्ठ अभियंता राघवेंद्र गायधनकर यांना सहायक अभियंता या पदोन्नतीवर विभागीय कार्यालयात कायम ठेवले. नगर अभियंता कार्यालयातील कनिष्ठ अभियंता किशोर तळीखेडे, शाम कन्ना, हारून सिद्दीकी यांना पदोन्नतीने त्याच विभागात कार्यरत ठेवले आहे.

पदोन्नतीने पदस्थापीत केलेल्या आदेशात विविध ठिकाणी बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. जर कोणी तसे केल्यास संबंधित सेवकांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) चा भंग केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR