14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत. अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व. संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचे परिषदेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भातील निर्णय शासनाला कळवण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ईमेलद्वारे याबाबत मागणी निवेदन दिले आहे.

राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. सरपंच हा लोकसेवक असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय आहे. त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवि ३५३, आताचे भारत न्यायसंहिता १३२ प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा, तरच गावच्या विकासकामात अडथळा आणणा-यावर जरब बसेल. गावच्या हितासाठी समाजसेवेत भाग घेणा-या सरपंचांना व त्यांना मदत करणा-या ग्रामपंचायत कर्मचा-यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

सरपंच परिषदेच्या शासनाकडे मागण्या
– सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा
– प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण अनिवार्य करण्यात यावे
– स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना फाशीच व्हावी
– स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी
– स्व. संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करावे
– सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे
– ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR