14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड गजाआड

संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड गजाआड

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या पुण्यात आवळल्या मुसक्या सोनावणेला कल्याणमधून अटक, तिघांना १४ दिवसांची कोठडी

बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला अखेर आज पहाटे बालेवाडीतून अटक करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल २६ दिवसांनी तो तपास यंत्रणांच्या हाती लागला. सीआयडी, एसआयटी, स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत होते. एका डॉक्टरच्या टिपमुळे घुले पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यासोबतच सुधीर सांगळेलाही अटक झाली. यासोबतच सिद्धार्थ सोनावणे याला कल्याणमधून बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. दरम्यान, आज अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची म्हणजेच १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पंचक्रोशीतला एक डॉक्टर त्याच्या पत्नीसह नॉट रिचेबल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डॉ. संभाजी वायभसे असे या डॉक्टरचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. पण संभाजी वायभसे त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीलाही अनुपस्थित होता. त्यामुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला. गेल्या ५ दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. डॉ. वायभसे त्याच्या पत्नीसह केरळला गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीआयडीचे एक पथक तिकडे गेले. अखेर काल संध्याकाळी वायभसेला नांदेडमधून अटक करण्यात आली होती.

डॉ. वायभसेला अटक केल्यानंतर त्याला चौकशीसाठी बीडला आणण्यात आले. सुदर्शन घुलेचे वायभसेशी जवळचे संबंध असल्याची माहिती तपासातून समोर आल्याने वायभसेची कसून चौकशी करण्यात आली. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली या चौकशीवेळी उपस्थित होते. देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपींनी वायभसेशी संपर्क केलेला होता. त्याने आरोपींना पैशांची मदत केली असल्याचा संशय पोलिसांना होता.

दरम्यान, चौकशीत डॉ. वायभसेने पोलिसांना महत्त्वाची टिप दिली. त्यानंतर तपास यंत्रणांनी पुण्यातील बालेवाडी गाठली. तेथील एका घरावर छापा टाकण्यात आला. डॉ. संभाजी वायभसेने दिलेल्या माहितीवरून कारवाई करीत दोघांना बेड्या ठोकल्या तर संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणारा तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनावणे याला कल्याणमधून उसाच्या गाडीवरून अटक केली.
त्यानंतर या तीनही आरोपींना आज बीडमध्ये कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात तपास अधिकारी, सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. खंडणी, मारहाण, अपहरण, हत्या प्रकरणांत या तिघांची संघटित गुन्हेगारी असल्याचे तपासातून समोर आल्याचे कोर्टाला सांगण्यात आले. त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.

घुलेविरोधात १० गुन्ह्यांची नोंद
सुदर्शन घुलेच्या नावावर गेल्या १० वर्षांत १० गुन्ह्यांची नोंद आहे. यातील ८ गुन्हे केज तालुक्यात, १ धारुर आणि १ अंबाजोगाईमधील आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणातून सरपंच देशमुख यांची हत्या झाली. याच प्रकरणात प्रकल्प असलेल्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली होती. खंडणी, मारहाण आणि खून अशा तिन्ही एफआयआरमध्ये घुलेचे नाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR