अमरावती : नैऋत्य बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचे रुपांतर अखेर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. हे मिचॉन्ग चक्रीवादळ ५ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे आणि यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली.
पीएम मोदी यांनी ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आंध्र प्रदेशातील तयारीचा आढावा घेतला. तसेच केंद्राकडून सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. राज्याला शक्य ती सर्व मदत केली जाईल याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिल्या आहेत. हे चक्रीवादळ मंगळवारी सकाळी नेल्लोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. हवामान हवामान विभागाने ५ डिसेंबर रोजी ताशी ८०-१०० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
या चक्रीवादळाच्या तयारीसाठी मासेमारी बोटींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे. तसे संपूर्ण तामिळनाडूमध्ये १२१ निवारागृहे आणि ४,९६७ मदत केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, चेन्नई आणि कांचीपूरमसह तामिळनाडूमधील १६ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज राज्याच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशात रेड अलर्ट
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या काही भागांत रेड अलर्ट जारी केला आहे. आंध्र प्रदेशचा आणि यानमच्या किनारी भागात ३,४ आणि ५ डिसेंबर रोजी मुसळधार ते अतिवृष्टी (२०४.४ मिलिमीटर) होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टी भाग आणि पाँडेचेरीमध्ये आज आणि उद्या काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तेलंगणामध्ये ५ डिसेंबरसाठी ऑरेट अलर्ट जारी केला आहे.
महाविद्यालयांना सुटी जाहीर
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाँडेचेरी सरकारने पाँडेचेरी, कराईकल आणि यानम प्रदेशातील महाविद्यालयांना सुटी जाहीर जाहीर केली आहे. तसेच इतर राज्य सरकारांना त्यांची बचावपथके सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. दक्षिण रेल्वेने तामिळनाडूमधील ३ ते ६ डिसेंबर दरम्यान राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या गाड्यांसह एकूण ११८ गाड्या रद्द केल्या आहेत.