20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रगोरंट्याल यांच्या भूकंपाचा दावा म्हणजे फुसका बार!

गोरंट्याल यांच्या भूकंपाचा दावा म्हणजे फुसका बार!

अर्जुन खोतकरांनी उडवली खिल्ली

जालना : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी लवकरच आपण मोठा भूकंप करणार असल्याचा दावा केला होता. शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी मात्र गोरंट्याल यांच्या भूकंपाचा दावा फुसका असल्याचे सांगत खिल्ली उडवली. डरकाळी फोडणारे वाघ कधी अंगावर येत नसतात, असा चिमटाही खोतकर यांनी काढला.

विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल कमालीचे नाराज आहेत. पक्षातील लोकांनीच आपला घात केल्याचा आरोप करत मतदारसंघात जास्त काम करणा-याला जनता ‘जा ना’असे म्हणते, अशा शब्दांत गोरंट्याल यांनी उद्विग्नता व्यक्त केली होती. एवढेच नाही तर खासदार कल्याण काळे यांनाही सावधानतेचा इशारा देत लवकरच आपण जालनाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणार असल्याचे म्हटले होते.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना या भूकंपाविषयी माध्यमांनी छेडले असता स्मित हास्य करत खोतकर यांनी भूकंप वगैरे काही नाही तो फुसका बार आहे. या विषयावर मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊनच बोलेन. डरकाळी फोडणारे वाघ कधी अंगावर येत नसतात, असा टोलाही खोतकर यांनी यावेळी लगावला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा ३० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला.

हा पराभव गोरंट्याल यांच्या जिव्हारी लागला आहे. पक्षातील पदाधिका-यांनी निवडणुकीत आपल्याला दगा दिला, असा त्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस सोडून जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहेत. त्यातच जाहीर कार्यक्रमात गोरंट्याल यांनी राजकीय भूकंप घडवण्याची भाषा केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR