नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांत महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत ५३.३ टक्के इतकी झाली आहे. २०२३-२४ साठी यूडीआयएसई प्लसच्या अहवालानुसार देशात शिक्षिकांची ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.
२०१८-१९ मध्ये शाळांत पुरुष शिक्षक अर्ध्यापेक्षा अधिक होते. तेव्हा ९४.३ लाख शिक्षकांपैकी ४७.१६ लाख (५०.०१ टक्के) पुरुष होते. सध्या भारतात पुरुष शिक्षकांची संख्या ४५ लाख ७७ हजार २६, तर शिक्षिकांची संख्या ५२ लाख ३० हजार ५७४ आहे. देशात सध्या ९८ लाख ७६ हजार शिक्षक आहेत.
केरळमध्ये ८० टक्के शिक्षिका : केरळ, पंजाब आणि हरियाणामध्ये शिक्षिकांची संख्या अनुक्रमे ८० टक्के, ७६ टक्के आणि ६४.७३ टक्केपर्यंत आहे, तर राजस्थानसारख्या राज्यांमध्ये सध्या ही पुरुष शिक्षकांची संख्या अधिक आहे. हे प्रमाण ६० टक्के इतके आहे. केरळमध्ये सरकारी शाळांमध्ये ७८ टक्के महिला शिक्षक आहेत, तर तामिळनाडू (६७ टक्के) आणि दिल्लीत (६१ टक्के) शिक्षिका आहेत.
उच्च शिक्षणात पुरुषांचा दबदबा : महिलांची वाढती संख्या ही शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित आहे. उच्च शिक्षणात मात्र पुरुषांचा दबदबा कायम आहे. २०२१-२२ च्या उच्च शिक्षणावर आधारित भारतीय सर्वेक्षणानुसार प्राध्यापिकांची संख्या ४३ टक्के, पुरुषांची संख्या ५७ टक्के आहे. २०१८-१९ मध्येही महिलांचे प्रमाण कमी होते.