गडचिरोली : प्रतिनिधी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल महिला नक्षल नेता तारक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यानंतर ८ जानेवारीला आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नक्षल चळवळीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी गडचिरोली दौ-यावर होते. त्यावेळी ११ नक्षलवाद्यांनी त्यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली होती. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पुनर्वसनाबाबत आश्वासन देताना नक्षली चळवळीतील इतरांनीही पोलिसांसमोर शरण यावे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.