सिद्दिकी हत्येसंबंधी ४५९० पानांचे आरोपपत्र
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केला आहे. त्यांच्याकडून तब्बल ४५९० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. बिश्नोई गँगने सिद्दीकी यांच्या हत्येसाठी १७ लाख रुपयांची सुपारी दिली होती. सिद्दीकी यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध आहेत. बिश्नोई गँगचा सलमान खानवर अनेक वर्षांपासून राग आहे. त्यामुळे सलमानच्या जवळच्या व्यक्तीला मारण्याचा कट आखण्यात आला. सलमान खानच्या मनात दहशत बसवण्यासाठी सिद्दीकी यांची हत्या घडविल्याची माहिती आरोपपत्रात आहे.
सलमान खानची हत्या करण्याची योजना आखण्यात आलेली होती. पण त्याच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने आरोपींचा डाव फिस्कटला. सिद्दीकी यांचे मारेकरी तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून त्यांच्या घराची, कार्यालयाची रेकी करत होते. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट खूप आधीच शिजला होता, असा तपशील आरोपपत्रात आहे.
बिश्नोई गँगने सुपारी दिल्यानंतर आरोपी कुर्ल्यात एक खोली भाड्याने घेऊन राहायला आले. ते तिथून दररोज वांद्रयाला जाऊन सिद्दीकी यांच्या घराची, कार्यालय परिसराची रेकी करायचे. त्यावेळी त्यांच्याकडे एक सॅक असायची. त्यात पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असायची. जवळपास दीड ते दोन महिने त्यांनी या प्रकारे रेकी केली, असा धक्कादायक उलगडा तपासातून झालेला आहे.