वैकुंठद्वार तिकीट काऊंटरवर गर्दी उसळल्याने दुर्घटना
अमरावती : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली. तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वास्तविक वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच टीटीडी तिरुमला येथील भाविकांना १० दिवसांसाठी वैकुंठद्वार दर्शन देणार आहे. १० ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे एसएसडी टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या घटनेबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र शोक व्यक्त केला तर त्यांनी घटनेतील जखमींना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिका-यांशी फोनवर चर्चा केली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या घटनेप्रकरणी उच्चस्तरिय बैठक बोलावून आढावा घेतला.