17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeपरभणीलातूर-परभणी धावत्या बसने घेतला पेट

लातूर-परभणी धावत्या बसने घेतला पेट

गंगाखेड : प्रतिनिधी
गंगाखेड ते परभणी रस्त्यावर गंगाखेड आगाराच्या लातूर ते परभणी धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रुमणा पाटीजवळील दैठणा गोलाई परिसरात घडली. या घटनेत तीस प्रवाशांसह चालक आणि वाहक बालंबाल बचावले. बर्निंग बसचा थरार बघून रस्त्याने येणा-या जाणा-यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

गंगाखेड आगाराची कोद्री मार्गे लातूर जाणारी मुक्कामी बस क्रमांक एमएच २० बीएल २६९१ गुरुवारी सकाळी लातूर येथून कोद्री, गंगाखेड मार्गे परभणीकडे निघाली होती. गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील रुमणा पाटी जवळील दैठणा गोलाई जवळ पोहचली असता चालक महादेव मुंडे यांना इंजिनमधून धूर निघत असल्याचे व काहीतरी जळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बस रस्त्याच्या बाजूला थांबवून खाली उतरुन पाहणी करत असतांना अचानक रेडिएटरने पेट घेतला. तेंव्हा त्यांनी वाहक चंद्रकांत नोमुलवार यांना जोरात आवाज देऊन प्रवाशांना खाली उतरविण्यास सांगितले. प्रवाशी उतरे पर्यन्त चालकाच्या कॅबिनने पेट घेतल्याने बसमध्ये धुरच धूर झाला होता. प्रसंगावधान राखत चालक व वाहकाने रस्त्याने धावणा-या दुस-या बसमधील अग्नी रोधक यंत्र घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरातील शेतकरी लक्ष्मण कच्छवे, आश्विन कच्छवे, सुरज कच्छवे, इस्माईल इनामदार आदींनी दुचाकीवरून पाणी आणत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. बसमधील प्रवाशांना दुस-या बसमध्ये बसवून परभणीकडे रवाना केले.

समय सूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली
गंगाखेड आगाराच्या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना लक्षात येताच चालकाने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे संपूर्ण बसने पेट घेण्याआधी बसमधील ३० प्रवासी व वाहकाचे प्राण वाचले आहेत. बस पेटत असल्याची बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली नसती तर आग डिझेल टाकीपर्यंत पोहचल्यानंतर टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. केवळ चालकाच्या समय सूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रवासी वर्गातून बोलल्या जात होते. या आगीत बस चालकाच्या कॅबिन, रेडिएटर जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दल दाखल
गंगाखेड आगाराच्या लातूर परभणी बसला आग लागल्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. परिसरातील शेतकरी, दैठणा ग्रामस्थ व चालक, वाहकांनी तारेवरची कसरत करून आगीवर नियंत्रण मिळविले. आग आटोक्यात आल्यानंतर गंगाखेड व परभणी अग्निशमन दलाची गाडी आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR