23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमनोरंजनक्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही

क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही

प्रिया बापटची खंत

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या हिंदी इंडस्ट्रीत जास्त दिसते. प्रिया-उमेशचे मराठी नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. मात्र बाकी प्रिया मराठी सिनेमांमध्ये नाही तर हिंदी सिनेमा, वेबसीरिजमध्ये दिसते. यावर तिने २०१८ नंतर मराठी सिनेमाची ऑफरच आली नाही असा खुलासा केला होता. तर आता तिने उमेशलाही मराठी सिनेमांमध्ये फारशी संधी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. उमेश हा मराठी सिनेमातला अंडररेटेड कलाकार असे ती नुकतेच एका मुलाखतीत म्हणाली.

प्रिया बापट-उमेश कामत ही मराठी प्रेक्षकांची लाडकी जोडी. मात्र ही जोडी मराठी सिनेमे फारसे करताना दिसत नाही. नुकतेच अमोल परचुरेंच्या कॅचअप युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली, मी आणि उमेश या विषयावर खूप बोलतो. उमेशचा आतापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. मला प्रामाणिकपणे असे वाटते की त्याला नाटक आणि मालिकेत जितक्या विश्वासार्हतेने पात्र दिली गेली आहेत. तितक्या विश्वासाने सिनेमात दिली गेली नाहीत. याचे कारण मला कधीच कळले नाही. आता हे बोलले पाहिजे की नाही माहित नाही पण मला कायम असे वाटते की तो मराठी सिनेमातला सर्वात अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने नाटकांमधून स्वत:साठी मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. मलाच काय तर इंडस्ट्रीत कोणालाही त्याच्या क्षमतेवर शंका नसेल. तो खूप ताकदीचा अभिनेता आहे पण का कोण जाणे तो सिनेमात अंडररेटेड आहे. त्याप्रकारचे सिनेमे त्याला ऑफरच झाले नाही. तशा भूमिका त्याला मिळाल्याच नाही. याबद्दल आम्ही खूप चर्चा करतो की असे का होते.

ती पुढे म्हणाली, मला वाटते की हे माझ्याबाबतीत आहे पण त्याच्यासोबत हे का होतेय? हे खूप दुर्दैव आहे. जे मेकर्स आहेत त्यांना उमेशला घेऊन सिनेमा का करायचा नाही? आपण मराठी इंडस्ट्री म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नुसते प्रेक्षक येत नाहीत असे म्हणून चालणार नाही. मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्रात इतर सिनेमांचेही इतके पर्याय आहेत. त्याच तोडीचा मराठी सिनेमा जर आला तर मराठी माणूस ते पाहायला जाईल. हेच प्रेक्षक नाटकाबाबतीत तसे करत नाहीत. साऊथमध्ये सिनेमा ही संस्कृती आहे.

तसे मराठीत नाटक हे संस्कृतीचा भाग आहे. प्रेक्षक त्यासाठी येतो. ज्याप्रकारच्या संहिता आपण आजच्या काळात आणायला पाहिजे, सिनेमॅटिक भाषेत त्या सांगायला पाहिजे तसं आपण सांगत नाही हे माझे एक कलाकार आणि इंडस्ट्रीचा भाग म्हणून अत्यंत प्रामाणिक मत आहे. आपल्याकडे नाटक आणि मालिकांमधून आलेली बरीच लोक आहेत. त्यामुळे सिनेमा सुद्धा अगदी नाट्यमय पद्धतीने सांगितला जातो. पण सिनेमा चित्रातून बघण्याची मजा आली पाहिजे. आपण प्रेक्षकांना काय दाखवतोय हे आधी तुम्ही स्वत:च पाहा. सिनेमा आपली संस्कृती आहे असे समजून आपल्याला सातत्याने लोकांना तसा कंटेंट द्यावा लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR