23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भ गारठला

विदर्भ गारठला

नागपूर सर्वात थंडगार, पारा ८.२ वर

नागपूर : दोन दिवसांपासून तापमानाची घसरण सुरू असून नागपूरसह विदर्भात थंड लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी विदर्भात नागपूर शहर सर्वात थंडगार ठरले. रात्रीचा पारा पुन्हा ३ अंशाने घसरत ८.२ अंशावर पोहचला. थंडगार वा-यामुळे नागपूरकरांना बोच-या थंडीची जाणीव होत आहे. दुसरीकडे कमाल पारा सरासरीच्या खाली असल्याने दिवसासुद्धा थंडी जाणवत आहे.

उत्तर भारतातील बहुतेक राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जबरदस्त थंडी वाढली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात वाढलेली थंडी कमी झाली होती. पारा १७ अंशापर्यंत पोहचला होता. मात्र त्यानंतर पुन्हा गारठा वाढला. हवामान विभागाने या आठवड्यात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सोमवार ६ जानेवारीपासून विदर्भाच्या किमान तापमानात घसरणीचे सत्र सुरू झाले. बुधवारी नागपूरचा पारा १०.२ अंशावर होता, जो २४ तासांत २ अंशाने घसरत ८.२ अंशावर आला. किमान तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी आहे.

नागपूरशिवाय गोंदिया येथे ८.४ व चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीत तापमान ८.५ अंशावर घसरले आहे. वर्धासुद्धा ९.६ अंशावर आहे. त्यानंतर इतर बहुतेक शहरे १० अंशावर आहेत. मात्र थंड वा-यामुळे थंडीची तीव्रता तापमानाच्या तुलनेत अधिक वाटत आहे. ही बोचरी थंडी आणखी दोन दिवस त्रास देण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR