बीड : प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे (रा. मैंदवाडी) व अवादा एनर्जी कंपनीच्या अधिका-यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपातील विष्णू चाटे (रा. कौडगाव) या दोघांची एसआयटीच्या अधिका-यांनी केज पोलिस ठाण्यात ४ तास चौकशी केली. त्यानंतर बीडला आणले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण करून आरोपींनी त्यांची क्रूरपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली सध्या सहा आरोपी पोलिस कोठडीत आहेत तर मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या अधिका-यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे पोलिस कोठडीत आहेत. केज न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याने त्याचा मोबाइल अद्याप तपासी अधिका-यांना दिलेला नाही. त्यामुळे त्याला सात दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी शासनाने नियुक्त केलेले सरकारी वकील अॅड. जितेंद्र शिंदे यांनी केली होती. त्यानंतर विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश मुख्य न्या. पावसकर यांनी दिले होते.
चाटेचा मोबाईल अद्याप गायबच
विष्णू चाटेकडील मोबाइल अद्याप सापडलेला नाही. या मोबाईलच्या शोधासाठी व इतर महत्त्वाच्या तपासासाठी विष्णू चाटे व जयराम चाटे या दोघांना बुधवारी दुपारी एक वाजता केज पोलिस ठाण्यात आणले होते. येथे तब्बल चार तास दोघांचीही चौकशी झाली. त्यानंतर त्यांना पुन्हा बीडला हलविले.