21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्र‘टोरेस’ घोटाळा; एजंट रडारवर

‘टोरेस’ घोटाळा; एजंट रडारवर

कोट्यवधींची रोकड जप्त

मुंबई : लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या ‘टोरेस’ कंपनीने गुंतवणुकीवर दुप्पट, तिप्पट परताव्याबरोबरच अलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, लाखोंचे मोबाइल देण्याचे आमिष दाखवले होते. कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या जाहिरात पत्रकातून ही माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक आरोपींची निवासस्थाने आणि कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले. यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड, कृत्रिम खडे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली.

‘प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे ‘टोरेस’ या नावाने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या शहरांमध्ये दागिने, कृत्रिम हि-यांच्या ब्रँड सुरू करण्यात आला. यातील गुंतवणुकीबरोबर रोखीने गुंतवणूक स्वीकारून त्यावर दर आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमवारी दादर येथील शाखेत गोंधळ उडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी नागरिक तानिया (व्यवस्थापक) तर रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर (व्यवस्थापक) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या उमरखाडी, कुलाबा आणि डोंबिवली येथील घरी तसेच कंपनीच्या मुंबईतील कार्यालयांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकले. तपासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची कागदपत्रे, रोकड तसेच इतर बरेच काही हस्तगत करण्यात आले आहे.

एजंटवर नजर
‘टोरेस’मधील गुंतवणूकदारांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळींना माहिती दिली. या सर्वांनी माहिती देणा-यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गुंतवणुकीनुसार त्याला कमिशन मिळू लागले. असे अनेक एजंट मध्यस्थ असून त्यांनी कमिशन म्हणून लाखो रुपये मिळवले आहेत. हे एजंटही पोलिसांच्याही रडारवर आहेत.

विशेष कक्ष
गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांचा एक कक्ष शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी मुंबईमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत, अशी माहिती संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR