पुणे : पुण्यातील एका व्यक्तीने कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सहकारी महिलेवर चाकूने वार करत खून केला. हे घडत असताना उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणीही हस्तक्षेप केला नाही. या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) गंभीर दखल घेतली असून, आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने पत्र लिहून या प्रकरणाची जलद आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
आर्थिक वादातून पुण्यातील त्यांच्या कंपनीच्या पार्किंगमध्ये एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या सहका-याने चाकूने क्रूर हल्ला करून हत्या केली. अनेक लोकांनी हा भयानक हल्ला पाहिला; परंतु कोणीही हस्तक्षेप केला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३च्या संबंधित कलमांखाली आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच तपास निष्पक्ष आणि कालबद्ध पद्धतीने केला जाईल याची खात्री करावी. तसेच एफआयआरच्या प्रतीसह सविस्तर कारवाई अहवाल (एटीआर) दोन दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
शहरात कॉल सेंटरमध्ये काम करणा-या शुभदा कोदारे हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. त्यानंतर गुरुवारी या संपूर्ण प्रकाराचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ४० ते ५० लोक उभे असतानाही आरोपी तरुणीवर हल्ला करतोय आणि बाकी लोक बघ्याची भूमिका घेतात. तिच्या मदतीला कोणी गेले नसल्याचे या व्हीडीओतून समोर आले आहे. शुभदाला तात्काळ मदत मिळाली असती, तर ती आज वाचली असती. तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांच्या भूमिकेत असणा-यांमध्ये काही माणुसकी शिल्लक होती की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
आरोपी आणि मृत तरुणी सन २०२२ मध्ये डब्लू.एन.एस. कंपनीत एकत्र काम करत होते. तेव्हा त्यांचा एकमेकांशी परिचय झाला. पुढे मैत्री झाली. कृष्णाच्या म्हणण्यानुसार, शुभदा हिने वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या तातडीच्या उपचारांसाठी त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. मात्र, दिवसेंदिवस तिची पैशांची मागणी वाढत चालली होती. त्यामुळे कृष्णा याला संशय आला. त्याने अडीच-तीन महिन्यांपूर्वी शुभदा हिचे कराड येथील घर गाठले. तिथे त्याने वडिलांकडे विचारणा केली. त्यावेळी शुभदा हिने आपल्याकडून घेतलेले पैसे वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरले नसल्याचे पुढे आले.
कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकवण्याचे ठरवले. त्याला शुभदाला जखमी करायचे होते. मात्र, रागात त्याने कोयत्याने वार करत तिचा खून केला. याबद्दलचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून लोकांमध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.