नवी दिल्ली : तिहार तुरुंगात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छोटा राजनला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छोटा राजनच्या नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, छोटा राजनला एम्समधील ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे, त्याठिकाणी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, छोटा राजनच्या नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर पोलिस डॉक्टरांचा सल्ला घेतील. त्यानंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात नेले जाईल. छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. २००१ मध्ये एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे अनेक शत्रू आहेत. त्यामुळे रुग्णालयात त्याची सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. कोणालाही त्याला भेटण्याची परवानगी नाही. फक्त डॉक्टरच त्याच्याशी उपचारांबद्दल चर्चा करू शकतात. वॉर्डच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन छोटा राजन नेहमी पोलिसांच्या निगराणीखाली असतो.
इंडोनेशियामधून झाली होती अटक
छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती, ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. अटक होण्यापूर्वी छोटा राजन जवळजवळ तीन दशके फरार होता. छोटा राजन हा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असल्याचे म्हटले जात होते. छोटा राजनविरुद्ध खंडणी, खून, तस्करी आणि ड्रग्जचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध ७० हून अधिक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.